Sambhaji Nagar Murder : संभाजी नगर येथील वाळूंज उद्योगनगरीतुन गेल्या तीन आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या बांधकाम व्यावसायीकाची पेट्रोल ओतून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या व्यावसायीकाचा मृतदेह हा मध्यप्रदेशातील जंगलात आढळला होता.
किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा. कमळापूर) असे हत्या झालेल्या व्यक्तिचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह बुधवार (दि.९) सकाळी ९ च्या सुमारास मध्यप्रदेशातील जंगलात सापडला. आरोपींनी लोहकरे यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून जंगलात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या चालकाला अटक केली आहे. चालक जावेद सत्तार शेख असे अटक करण्यात आलेली संशयिताचे नाव आहे. लोहकरे यांचा मृतदेह हा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गोडवा गावातील जंगल परिसरात आढळून आला. लोहकरे यांची हत्या का करण्यात आली याची माहिती अद्याप पुढे आली नाही.
किशोर लोहकरे हे मुंबई येथे जात असल्याचे पत्नीला सांगून १७ सप्टेंबर रोजी घरातून १० लाख रुपयांची रोख घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांच्या सोबत गाडीचा चालक जावेद सत्तार शेख हा होता. दोन दिवसानंतर १९ सप्टेंबरला चालक जावेद शेख हा एकटाच कार घेऊन कमळापूरात घरी परत आला. त्यांनी किशोर लोहक्रे यांच्या पत्नी आशा लोहकरे यांना सोबत नेलेले १० लाख रुपये परत दिले. किशोर लोहकरे हे मुंबईत थांबल्याचे त्याने अशा यांना सांगितले. २६ सप्टेंबरला आशा यांना किशोर यांनी फोन करून इंदौरला असल्याचे सांगत चालक जावेद शेख याला १० लाख रुपये व कार घेऊन इंदौरला पाठवण्यास सांगितले.
आशा यांनी जावेद शेख याला १० लाख रुपये घेऊन इंदौरला पाठवले. किशोर लोहकरे यांनी पैसे घेऊन चालक शेख याला पुन्हा घरी परत पाठवले. यावेळी किशोर यांनी अशा यांना कोलकत्ता येथे जात असल्याचे सांगितले. २७ सप्टेंबरला चालक शेख हा एकटाच कार घेऊन कमळापूरात आला. त्यानंतर २८ सप्टेंबरला आशा यांनी किशोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद लागला. यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत किशोर बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
किशोर यांचा पोलिस शोध घेत होते. बुधवारी त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात जळलेल्या अवस्थेत आढळला. त्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. पोलिसांनी लोहकरे यांच्या नातेवाइकांना ओळख पटविण्यासाठी बोलवले. याएलई अंगावरील खुणा, हातातील अंगठीवरुन ते किशोर लोहकरे असल्याचं स्पष्ट झालं.
संबंधित बातम्या