Builder Sauji Manjiri Murder In Navi Mumbai : पुण्यातील दुहेरी खुनाची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अज्ञात इसमांनी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक साऊजी मंजिरी यांचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केला आहे. त्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
साऊजी मंजिरी हे इम्पिरिया ग्रुपच्या पाच पार्टनरपैकी एक होते. ते ६५ वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काही कामासाठी ते कारनं निघाले होते. त्यावेळी सेक्टर सहा इथं दोन मोटारसायकलस्वार त्यांच्या कारला आडवे आले आणि काही कळायच्या आतच त्यांनी बेछूट गोळीबार केला. साऊजी यांना गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अमित काळे, उपायुक्त पानसरे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि नेरुळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जमीन, मालमत्ता किंवा एखाद्या आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. साऊजी मंजिरी यांच्यावर कोणी व का गोळीबार केला याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
सावजी मंजिरी हे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायातील मोठं नाव आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची अशा तऱ्हेनं दिवसाढवळ्या हत्या झाल्यानं शहरातील उद्योजकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.