मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फडणवीसांच्या मर्जीतील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

फडणवीसांच्या मर्जीतील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 20, 2023 03:53 PM IST

ज्येष्ठ पोलीस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS officer Brijesh Singh appointed new secretary to CM Eknath Shinde; Ex IAS officer Praveen Pardeshi as new CEO of MITRA
IPS officer Brijesh Singh appointed new secretary to CM Eknath Shinde; Ex IAS officer Praveen Pardeshi as new CEO of MITRA

ज्येष्ठ पोलीस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र)च्या मुख्य कार्यकारीपदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंह हे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (गृहरक्षक दल) या पदावर कार्यरत होते. तर मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त परदेसी हे निवृत्त अधिकारी आहेत. सिंह आणि परदेसी हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. यापूर्वी २०१४-१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी राज्याच्या प्रशासनात महत्वाच्या पदावर कार्य केले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेसी हे काही काळ मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. करोना काळात त्यांना आयुक्तपदावरून हटवून इकबालसिंह चहल यांना आयुक्तपदावर आणण्यात आले होते. परदेसी हे केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले होते.

ब्रजेश सिंह हे भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक होते. सध्या ज्येष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर ज्येष्ठ आयएएस अधिकारी विकास खारगे हे प्रधान सचिव म्हणून काम पाहतात. त्यांच्या सोबतीला आता ब्रजेश सिंह यांची मुख्यमंत्र्याच्या टीममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सिंह आणि परदेसी या अधिकाऱ्यांना राज्याच्या प्रशासनात महत्वाच्या पदावर नियुक्ती केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या नियुक्त्या जाहीर केल्या आहे.

 

IPL_Entry_Point