Gokhale bridge: अंधेरीतील बर्फीवाला पूल आणि गोखले पूल जोडण्यात अखेर यश; १ जुलैपासून वाहनेही धावणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gokhale bridge: अंधेरीतील बर्फीवाला पूल आणि गोखले पूल जोडण्यात अखेर यश; १ जुलैपासून वाहनेही धावणार

Gokhale bridge: अंधेरीतील बर्फीवाला पूल आणि गोखले पूल जोडण्यात अखेर यश; १ जुलैपासून वाहनेही धावणार

Jun 19, 2024 08:02 PM IST

मुंबईत अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर आणून जुळवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना यश आले आहे.

मुंबईत अंधेरीतील बर्फीवाला पूल आणि गोखले पूल जोडण्यात मुंबई महापालिकेला यश
मुंबईत अंधेरीतील बर्फीवाला पूल आणि गोखले पूल जोडण्यात मुंबई महापालिकेला यश

मुंबई शहरात अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर आणून जुळवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना आज अखेर यश आले आहे. ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करून दोन्ही उड्डाणपूल जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्यात आले होते. कॉंंक्रिट क्यूरींगच्या कामानंतर येत्या १ जुलै २०२४ रोजी या दोन्ही पुलांवरील वाहतूक सुरू करण्याची तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. 

गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल आहे. या पुलाचा काही भाग जुलै २०१८ मध्ये कोसळला होता. यानंतर पश्चिम रेल्वेने गोखले उड्डाणपूल पाडले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने या पुलाची पुनर्बांधणीचे काम होती घेतले होते. गोखले पुलाचा पहिला टप्पा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याता आला. नवीन पुलाचे काम हाती घेतले आणि रेल्वे हद्दीतील पुलांच्या उंचीचे नवीन धोरण जाहीर झाले. यामध्ये जुन्या पुलांचे पाडकाम करून उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलांची उंची दोन मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे गोखले पुलाची उंची दोन मीटरपेक्षा अधिक वाढली. परिणामी, गोखले पूल हा बर्फीवाला पुलाला जोडता आला नव्हता. महापालिकेच्या अभियंत्यांनी केलेल्या या चुकीमुळे टीका करण्यात येत होती.

दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर त्यापुढील सलग सहा तास पाऊस न पडणे आवश्यक होते. विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर सदर परिसरात त्यापुढील १२ तासांपेक्षा अधिक कालावधीदरम्यान पाऊस न पडल्याने काँक्रिटीकरणाचे व स्टिचिंगचे काम विना अडथळा पार पडले. 

असे जुळवले दोन उड्डाणपूल !

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजुला १,३९७ मिलीमीटर व दुसऱ्या बाजुला ६५० मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपूलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्वाचे आव्हान होते. अवघ्या २ मिमि जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचुकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमुने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले.

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले उड्डाणपूल यांचे एकमेकांना जोडले जाणारे गर्डर जुळवण्यासाठी काँक्रिटिंगचे काम हे पावसाने उघडीप दिल्याच्या काळात करणे आवश्यक होते. तसेच सदर काम झाल्यानंतर सुमारे सहा तास पाऊस न येणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन व सदर सहा तासांच्या काळात पाऊस आल्यास पर्जन्यरोधक शेडची विशेष व्यवस्थाही सदर ठिकाणी करण्यात आली होती. 

गोखले पुलाला बर्फीवाला पुलाचा भाग जोडण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीनुसार स्टिचिंग व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या स्टिचिंग दरम्यान दोन्ही ब्रीजची लोखंडी सळई ही तांत्रिक सल्लागाराने सुचवलेल्या संरचनेप्रमाणे ‘वेल्डिंग’ करण्यात आली आहे. याठिकाणी काँक्रिट भरण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यानंतर सुमारे १४ दिवसांचा कालावधी हा क्यूरिंगसाठी लागणे अपेक्षित आहे. वेगाने कॉंंक्रिटीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी उच्च दर्जाचे कॉंंक्रिट या कामासाठी वापरण्यात आले आहे. या कामानंतर पूलावर २४ तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात येईल. त्यासोबतचा पुलाच्या जोडणी सांध्याचे कामही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते कार्य यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल, असेही पूल विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या