मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : काम सुरू असतानाच समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला, स्थानिकांमध्ये घबराट

Samruddhi Mahamarg : काम सुरू असतानाच समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला, स्थानिकांमध्ये घबराट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 09, 2023 10:10 AM IST

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचं काम सुरू असतानाच निर्माणाधीन पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bridge Collapsed On Samruddhi Mahamarg
Bridge Collapsed On Samruddhi Mahamarg (HT)

Bridge Collapsed On Samruddhi Mahamarg : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यानंतर नागपूर ते शिर्डी पर्यंतची वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आता नाशिक ते मुंबई दरम्यानच्या महामार्गाचं काम सुरू असतानाच नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे परिसरात समृद्धी महामार्गावरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु समृद्धी महामार्गावर काम करणारे कामगार आणि स्थानिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरील वाहतूक खुली करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक ते मुंबई या दरम्यानच्या महामार्गाचं काम हाती घेण्यात आलं आहे. इगतपुरीत तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरात काम सुरू असतानाच समृद्धी महामार्गावर अचानक भलामोठा पूल कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सिन्नर ते घोटी या दरम्यान महामार्गाचं काम केलं जात आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी बायपास आणि पुलांची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळं आता कामगार आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर या महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कार, अवजड वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळं आधीच अपघातामुळं चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर पूल कोसळल्याची घटना समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

IPL_Entry_Point