महाराष्ट्रातील मुस्लिम ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, स्मृतिशेष कॉ. विलास सोनवणे यांचे सहकारी म्हणून मी शब्बीर भाई अन्सारी यांचे नाव पूर्वी ऐकले होते. त्यानंतर ठाणे येथील कळवा विभागातील भटक्या व विमुक्त चळवळीचे नेते तुकारामजी माने यांच्या माध्यमातून पुन्हा अंसारी यांचे नाव ऐकले. महाराष्ट्रात मराठा आरक्षण लढा आणि ओबीसी चळवळीचा आरक्षण बचाव लढा यात शब्बीर अन्सारी महाराष्ट्रात चांगलेच ज्ञात झाले होते. माझी आणि त्यांची अकलूज येथे ओझरती भेट झाली होती. अमीर हॉटेलचे मालक चौधरी साहेब यांच्याकडे ते आले होते. त्यांच्या प्रती माझ्या मनात कुतुहल होते आणि चळवळीच्या नेत्याप्रती असलेला आदरही होता. परंतु त्यांच्या प्रत्यक्ष कार्याचा म्हणावा तितका परिचय नव्हता. मी माझे लिखाण त्यांना पाठवत असे. अन्सारी साहेबही माझे लेख गंभीरपूर्वक वाचत असत. यातूनच आमच्यात सुसंवाद वाढला आणि काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांचे ‘मंडलनामा’ हे पुस्तक माझ्याकडे पाठवले. मी ते अक्षरशः अधाशासारखे वाचून काढले. 'मंडलनामा' म्हटलं तर आत्मचरित्र. पण खरं सांगायचं तर तो ऐतिहासिक असा चळवळीचा दस्तावेज आहे.
पुस्तकाची सुरुवात त्यांच्या बालपणीच्या इतिहासापासून होते. आईने सांगितलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील पोलीस अॅक्शनची आठवण, यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना आणि शब्बीर भाई पोटात असताना जीवाच्या भीतीने जालन्याच्या साळी गल्लीतून कुटुंबाने केलेले पलायन. हिंदू बांधवांनी केलेले संरक्षण, पुढे हलाखीची परिस्थिती व अज्ञानातून असलेली शैक्षणिक अनास्था. शब्बीर भाई यांनी बालपणी डबल रोटीची (पाव बटर) ओरडून विक्री केली. घरातील विणकामास मदत करत शिक्षण पूर्ण केले. शब्बीर अंसारी यांना दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन, गणितासारख्या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवूनही परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. टेलरिंगचे काम करत करत बँकेचे अर्थ सहाय्य घेऊन होजीयरीची फॅक्टरी टाकली. मात्र ती बंद पडल्याने मुंबईचा मार्ग पकडावा लागला… 'मंडलनामा' पुस्तकात हा जीवन प्रवास वाचताना सहृदय माणसाच्या डोळ्यात नक्कीच पाणी येते. परंतु या दुःखाचे अधिक पाल्हाळ न लावता ते मुस्लिम ओबीसी चळवळीचा इतिहास सांगायला सुरुवात करतात.
मुस्लिम धर्मात जाती, जमाती नाहीत, एवढंच माहीत असलेल्या या युवकाला मुस्लिमातील चार जातींचा समावेश कसा? आणि माझा तोच व्यवसाय असेल तर त्या सवलती मला का मिळू नये, असे प्रश्न पडू लागले. आणि सुरू झाला विषयाचा पाठपुरावा. ओबीसी चळवळीचे अॅड जनार्दन पाटील यांच्याकडे जाऊन याबद्दल विचारणा केली. आणि पुढे कपील पाटील यांच्या माध्यमातून ओबीसी चळवळ चालवत या शोधयात्रेची व संघर्षाची सुरूवात झाली.
१९५५ साली स्थापन झालेल्या काका कालेलकर आयोगाने ओबीसीची व्याख्या केली होती. पण ती शिफारस अमलात न आणण्याची सूचनाही केली होती. त्यानंतर झालेल्या चळवळी व राजकीय स्थित्यंतरे यामुळे मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी दबाव सुरू झाला. मुस्लिम धर्मात जाती नाहीत, मशिदीत एकत्रित नमाज पडणारे आणि एकत्रित दस्तरखानवर भोजन घेणारे एकच असतात, असा बाहेरच्या जगात एक सर्वसाधारण समज आहे. यातून मुस्लिमेतर समाजात हाच संदेश जात राहिला की मुस्लिम हे सगळे एक आहेत आणि त्यांच्यात भेद नाहीत. हिंदूंमधील बहुतेक जाती या व्यवसायाच्या आधारे निर्माण झाल्या आहेत. आणि भारतीय राज्यघटना ही आरक्षण धोरण आखताना जात नाही तर वर्ग समूह पाया मानते. त्यामुळे ओबीसी चळवळ ही इस्लाम-विरोधी आहे हे म्हणणे त्यांनी खोडून काढले. या चळवळीच्या निमित्ताने शब्बीर अंसारी यांनी मुस्लिमांमधील एकूण ६९ जाती समूह शोधून काढले.
बागवान, तांबोळी, कुरेशी हे आपणास सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या मुस्लिम जमाती. परंतु कोल्हापूर-सांगली भागात राजे-महाराजे हे शिकारीसाठी शौक म्हणून चित्ते पाळत असत. हे काम करणाऱ्या मुस्लिमांना ‘मुसलमान चित्ता पारधी’ असं म्हटलं जायचं. यांना ‘मीर शिकारी’ व ‘नीर शिकारी’ म्हणूनही ओळखले जाते. ही मुस्लिमांमधली अती-अल्पसंख्य जमात आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी मुस्लिम पाथरवट व धावड जमाती राहतात. मुंबई येथील मदनपुरा भागात ‘दगड फोडू’ मशीद आहे. हा पुरावा देऊन शब्बीर अंसारी यांनी त्या जमातीला ओबीसीचा दाखला मिळवून दिला आहे. हिंदू समाजात जसे पखालीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणारे पाणकोळी असतात तसे मुस्लिम समाजात ‘भिश्ती’ असतात. उखळ बनवणारे टकारी, दुरड्या बनवणारे कैकाडी सदृश्य ‘काकर’, कल्हई करणारे कल्हईगार, माकडांचा खेळ करून उपजीविका करणारे माकडवाले, अस्वलांना नाचवून उपजीविका करणारे अस्वलवाले किंवा रीचवाले, गारुडी, फकीर, फकीर-बंदर वाला, तांडेल असे एक ना अनेक जमाती. या जमातीत जाऊन त्यांना जागृत करणे हे काम सोपे नव्हते. आरक्षण घेणे म्हणणे म्हणजे स्वतःला दलितांच्या रांगेत बसवून घेणे म्हणून कुरेशी गल्लीतून सुरे पाजळून तावातावाने अंगावर लोक धावून आल्याचा प्रसंग अंसारी यांनी झेलला आहे. आंध्रप्रदेशमध्ये मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी सरकारने मुस्लिमांना आरक्षण जाहीर केल्यानंतर ‘असे धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. आणि दिले तरी ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही’ हे निर्भयपणे सांगून शब्बीर अंसारी यांनी अनेकदा समाजाचा रोष पत्करून घेतला आहे.
मुस्लिम ओबीसीची चळवळ उभारत असताना शब्बीर अंसारी यांनी कुणाचाच मुलाहिजा ठेवला नाही. अस्वलवाले मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडमध्ये १००० अस्वल व त्यांचे मालक घेऊन सरकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सांगली जिल्ह्यात जत येथील तहसील कार्यालयावर मुस्लिम माकडवाले यांच्या ओबीसी प्रमाणपत्र मागणीसाठी माकडांना घेऊन मोर्चा काढला होता. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तहसीलमध्ये बिनविषारी व विषारी सापाचे (दात काढलेल्या) सोडण्याचे आंदोलन त्यांनी केले होते. हे सर्व करत असताना त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी सतत संपर्क असायचा. यात कर्पुरी ठाकूर पासून सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यापासून शरद यादव ते गोपीनाथ मुंडे, सुधाकर गणगणे, नाना पटोले, रामविलास पासवान, छगन भुजबळ, नवाब मलिक, विलासराव देशमुख, ड. भालचंद्र मुणगेकर, हसन कमाल, जॉनी वॉकर (काझी बदृद्दिन), कॉम्रेड विलास सोनवणे आणि हिंदी सिनेमाचे महानायक दिलीप कुमार… असे कितीतरी महान नेते, अभिनेते त्यांच्या संपर्कात आले.
चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांना मुस्लिम ओबीसी चळवळीशी जोडून घेणे ही एक अंसारी यांच्यासाठी परीक्षा होती. मुंबईत वांद्रे येथील जॉगर्स पार्कवर दिलीप कुमार यांनी त्यांना भेटीसाठी बोलावून घेतले होते. दिलीप कुमार व्यायाम करत करत शब्बीर अंसारी यांचे म्हणणे ऐकून घेत होते. आणि नंतर त्यांच्या रनिंग करण्याच्या व्यायामाला सुरुवात होते आणि शब्बीर भाई पळत पळत जसं जमेल तसं त्यांना सांगत जातात. त्यानंतर घरी चर्चेसाठी आमंत्रण मिळते. आणि त्यातून पुढे खातरजमा करण्यासाठी दिलीप कुमार हे महात्मा फुले मागास वर्ग महामंडळाला भेट देतात. ओबीसी प्रमाणपत्रामुळे गरीब घरातही डॉक्टर, वकील, इंजिनियर होतील हे पाहून दिलीप कुमार यांनी शब्बीर अंसारी यांचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘शब्बीरजी, मी यापुढे तुम्हाला शब्बीर म्हणून हाक मारणार नाही. तुम्ही 'मुजाहेद' आहात' (मुजाहेद म्हणजे समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी व्यक्ती).
अलिबाग येथे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या भेटीदरम्यान चर्चा करताना अंतुले यांचा रागाचा पारा चढला होता. त्याचा अतिरेक तेव्हा झाला जेव्हा ‘तुम्ही म्हणता सगळे समान आहेत तर तुमची मुलगी तांडेल यांच्या घरात द्याल काय?’ तेव्हा पोलिसांना सांगून शब्बीर अन्सारी यांच्या बखोटीला धरून बाहेर काढण्याचा प्रसंग आला होता. त्यासाठी असलेले त्यांच्या अंगातील धाडस आणि सच्चेपण आपणास अनेक ठिकाणी दिसते.
चळवळ प्रामाणिक असेल आणि तिचा नेताही शुद्ध नैतिक आचरण करणारा असेल तर समाजातील स्त्रीयाही त्यांच्या सोबत येतात. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमध्ये सांगली येथील नसीम महात यांचे योगदान खूप मोठे आहे.
सर्वांनीच वाचावे असे हे पुस्तक आहे. उदगीर (जि. लातूर) येथील जंगली बुक्स अँड पब्लिकेशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठावरील अर्कचित्र रोहित पुणेकर यांनी चितारले असून रवी जाधव यांनी उत्कृष्ट मांडणी केली आहे.
……
पुस्तकाचे नावः मंडलनामा
लेखकः शब्बीर अहमद अन्सारी
प्रकाशकः जंगली बुक्स अँड पब्लिकेशन्स, उदगीर (जि. लातूर)
पानेः १९१; किंमत: ३५० रुपये
संपर्कः 9356609093
(अॅड. अविनाश टी काले हे अकलूज ( जि. सोलापूर) येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आहेत)
संबंधित बातम्या