कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही; मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला दणका!-bombay high court restrains any political party or person from calling for maharashtra bandh ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही; मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला दणका!

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही; मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला दणका!

Aug 23, 2024 04:45 PM IST

Bombay High Court On Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंद विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.

मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका
मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका (HT_PRINT)

Maharashtra Bandh Updates: बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र, याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींना आपल्या वासनेचा शिकार बनवणाऱ्या नराधम शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय शिंदे (वय,२३) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त पालक व नागरिकांनी मंगळवारी शाळेबाहेर निदर्शने केली. याच पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतर्फे येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र, महाविकास आघाडीने शनिवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.'

याचिकेत काय म्हटले?

‘आगामी महाराष्ट्र विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहता अशा बंदना हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करावा आणि हा बंद बेकायदा जाहीर करावा', अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.

काँग्रेस नेत्याची महाराष्ट्र सरकार टीका

बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार-हत्या केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या रागिणी नायक यांनी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

संतप्त पालकांच्या निदर्शनानंतर पुढील कारवाईला सुरुवात

११ आणि १२ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत शिपायाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. कोलकात्याच्या वैद्यकीय केंद्रात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठवडाभरापासून अनेक राज्यांतील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. बदलापूरच्या घटनेत एफआयआर दाखल करण्यास उशीर होत असल्याबद्दल नायक यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली.संतप्त पालक आणि नागरिकांनी निदर्शने केल्यानंतरच पुढील कारवाईला सुरुवात झाली, असाही नायक यांनी आरोप केला.

बदलापूर शाळेशी भाजप नेत्यांचा संबंध

मुंबई उच्च न्यायालयानेही पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल फटकारले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र सरकार संवेदनशील असते तर त्यांनी या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला नसता. सखोल चौकशीची विरोधकांची मागणीही नाटक म्हणून रंगवली. संबंधित शाळेच्या बोर्डावर भाजपचे काही नेते आहेत,' असाही आरोप नायक यांनी केला.