मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदासाठी शिफारस

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदासाठी शिफारस

HT Marathi Desk HT Marathi
Sep 27, 2022 02:21 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले दीपांकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Chief justice Dipankar Datta of the Bombay high court
Chief justice Dipankar Datta of the Bombay high court (HT_PRINT)

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सध्या कार्यरत असलेले न्या. दीपांकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी स्थापित कलोजियमने सोमवारी न्या. दत्ता यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. कलोजियमच्या शिफारशीचा मसुदा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. उदय लळित हे या कलोजियमचे प्रमुख असून यात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, संजय किशन कौल, एस. ए. नझीर आणि के. एम. जोसेफ यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती लळित यांनी २७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कलोजियमचा हा पहिला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची एकूण संख्या ३४ असून यापैकी ५ पदे रिकामी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी या २३ सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यामुळे एक पद रिकामे झाले आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर बढती देण्यासाठी कलोजियमच्या गेल्या आठवडाभरात लागोपाठ बैठकांचे सत्र पार पडले होते. पहिल्या तीन बैठकांमध्ये न्यायाधीशाच्या नावावर एकमत होत नव्हते. परंतु सोमवारी झालेल्या बैठकीत न्या. दीपांकर दत्ता यांच्या नावावर कलोजियमचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी ‘एचटी’ला दिली. या बैठकीत इतर अन्य नावांवरही चर्चा झाली. येत्या आठवडाभरात या इतर नावांची शिफारसही करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीश पदासाठीच्या नावांचीही या बैठकांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता (वय ५७) यांची जून २००६ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांना बढती मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणून करण्यात आली होती. सोमवारी कलोजियमने दत्ता यांच्या नावाच्या शिफारशीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यास सर्वोच्च न्यायालयात त्यांना आठ वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या