Badlapur Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यास योग्य तो आदेश देण्यास भाग पाडले जाईल, असेही स्पष्ट केले.
आपल्या मुलाचा मृत्यू हा गणवेशधारी लोकांनी केलेला निर्घृण खून आहे, असा दावा करत अक्षच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. याबाबत न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अक्षयने पोलिसांची पिस्तुल कशी हिसकावली? ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. तसेच एखादा कमजोर व्यक्ती पिस्तूल लोड करू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
'अक्षय शिंदेला पोलिसांनी आधी पकडण्याचा प्रयत्न का केला नाही? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते. ज्या क्षणी आरोपीने ट्रिगर ओढला, त्याचवेळी त्याला रोखता आले असते. इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखले का नाही? तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणे कठीण आहे. हा एन्काऊंटर असू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
शाळेतील शौचालयात चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या अक्षय शिंदेला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून शिंदेला चौकशीसाठी पोलिसांच्या वाहनातून घेऊन जात होत. दरम्यान, मुंब्रा बायपासजवळ अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.