Mumbai KES College News: मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील केईएस कॉलेजला आज (२७ जानेवारी २०२५) बॉम्बने उडवून देणाऱ्या धमकीचा मेल आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. केईएस कॉलेजच्या अधिकृत ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील केईएस कॉलेजला त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बच्या धमकीचा ईमेल आल. याबाबत कॉलेज प्रशासनाने पोलिसांना माहिती देताच पोलीसांचे एक पथक ताबडतोब कॉलेजमध्ये दाखल झाले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा प्रोटोकॉल जारी करण्यात आले. अधिकारी कॉलेज परिसरातील कसून तपासणी करत आहेत. तसेच धमकीच्या इमेलचा काय हेतू असू शकतो, याचाही शोध घेतला जात आहे.'
मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा परिसरातील एका शाळेला २३ जानेवारी रोजी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. बॉम्बच्या धमकीच्या ई-मेलवर कारवाई करत इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम शाळेत रवाना करण्यात आली. मात्र, पोलीस तपासात ईमेलद्वारे मिळालेली धमकी फसवी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी १४ जानेवारी रोजी गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. इंडिगोच्या ६ ई ५१०१ या विमानाला विलगीकरण कक्षात नेण्यात आले आणि मुंबईत उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी चेन्नईला जाणाऱ्या विमानाला रविवारी पहाटे फोनवरून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती, जी फसवी ठरली, अशी माहिती विमानतळावरील अधिकृत सूत्रांनी दिली. कोचीहून सुमारे ८५ प्रवाशांना घेऊन निघालेल्या या विमानाच्या लँडिंगनंतर कसून तपासणी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तास आधी जम्मूतील मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी कसून शोध घेण्यात आला.
गुजरातमधील वडोदरा येथील नवरचना शाळेला २४ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या संदेशात शाळेच्या पाईपलाईनमध्ये बॉम्ब असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती वडोदरा सहाय्यक पोलिस आयुक्तांनी दिली.
तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील दोन शाळांना २१ जानेवारी रोजी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. इरोडपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या थिंडल येथील भारती विद्या भवन आणि थेरक्कुपल्लम या दोन उच्च माध्यमिक शाळांना सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी ई-मेल आला होता की, आवारात बॉम्ब ठेवण्यात आले असून ते केव्हाही स्फोट होऊ शकतो.
संबंधित बातम्या