बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलीस अलर्टवर
Salman Khan Death Threat : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
Salman Khan Death Threat : पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून त्याच्या सुरक्षेवर मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष असणार असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानला बंदुकीचा परवानाही देण्यात आला असून त्याच्या घराबाहेर २४ तास पोलिसांचा पहारा असणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सुरक्षा विभागानं अभिनेता सलमान खानला सुरक्षा दिली असून स्थानिक वांद्रे पोलिसांच्या विशेष युनिटचंही सलमानच्या सुरक्षेवर नजर असणार आहे. याशिवाय सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता सलमान खानने माफी न मागितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून दिली आहे. त्यामुळं आता या प्रकरणानंतर मुंबई पोलीस अलर्टवर आहेत.
लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील कुख्यात गँगस्टर असून गेल्या वर्षी त्याच्या साथीदारांकडून पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली होती. लॉरन्स बिश्नोई सध्या तुरुंगात असून त्यानं तेथून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं मुंबईत खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.