बॉडी वॉश, शॉवर आणि गिझरही, फाईव्ह स्टार हॉटेलमधील अंघोळीसारखी मज्जा; मुंबईतील रस्त्यांवर धावतेय अनोखी बस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बॉडी वॉश, शॉवर आणि गिझरही, फाईव्ह स्टार हॉटेलमधील अंघोळीसारखी मज्जा; मुंबईतील रस्त्यांवर धावतेय अनोखी बस

बॉडी वॉश, शॉवर आणि गिझरही, फाईव्ह स्टार हॉटेलमधील अंघोळीसारखी मज्जा; मुंबईतील रस्त्यांवर धावतेय अनोखी बस

Published Feb 12, 2025 11:31 PM IST

Mumbai Bus : मुंबईतील रस्त्यांवर धावणारी ही साधारण बस नाही, तर चालते फिरते लक्झरी बाथरूम आहे. बसमध्ये पाच मोबाइल फोन चार्जिंग पॉइंट, दोन कपडे ड्रायर आणि सुसज्ज आंघोळीची खोली आहे.

मोबाईल बाथरुम बस
मोबाईल बाथरुम बस

हायटेक मोबाइल बाथरूमने सुसज्ज अशी एक अनोखी बस मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. अनेक महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ही अनोखी बस मोफत आंघोळीची सुविधा देत असून विशेष म्हणजे सुरू होऊन केवळ एक महिना झाला असला तरी त्याचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे.

काय आहे या मोबाईल बाथरूम बसचे वैशिष्ट्ये?

मुंबईत धावणारी ही साधारण बस नाही, तर चालते फिरते लक्झरी बाथरूम आहे. बसमध्ये पाच मोबाइल फोन चार्जिंग पॉइंट, दोन कपडे ड्रायर आणि सुसज्ज आंघोळीची खोली आहे. प्रत्येक बाथरूममध्ये हँडवॉश, बॉडी वॉश, बादली, नळ, शॅम्पू, शॉवर, गीझर आणि अगदी टब देखील उपलब्ध करून दिला आहे. एवढेच नव्हे तर पाणी बचतीसाठी यात खास यंत्रणा बसवण्यात आली आहे, ज्यामुळे अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बसचे पाणी फ्लश होते. ही बस केवळ स्वच्छतेचे आणि सोयीचे प्रतीक बनली नाही, तर दोन महिलांसाठी रोजगाराचे ही साधन बनली आहे.

कोणी सुरू केला हा उपक्रम?

महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही अभिनव संकल्पना मांडली असून जिल्हा नियोजन समिती आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 'बी द चेंज' नावाची संस्था चालवणाऱ्या तीन बहिणी ही बस चालवत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि निष्ठेमुळे हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे.

मुंबईतील अन्य ठिकाणीही दिसणार अशा बसेस - 

मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलांसाठी सध्या ही बस उपलब्ध आहे. या अनोख्या उपक्रमामुळे स्थानिक महिला खूप खूश असून अधिकाधिक महिलांना याचा वापर करण्यासाठी प्रेरित करत आहेत. हे यश लक्षात घेता महापालिकेने आता ही योजना शहरातील इतर भागातही राबविण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातही याचा उल्लेख करण्यात आला असून, येत्या काळात मुंबईतील महिलांसाठी अशा प्रकारच्या आणखी मोबाइल लक्झरी बाथरूम बस रस्त्यावर दिसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या