मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दापोलीत सापडलेल्या बोटीबाबत तटरक्षक दलाने केला मोठा खुलासा

दापोलीत सापडलेल्या बोटीबाबत तटरक्षक दलाने केला मोठा खुलासा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 24, 2022 06:24 PM IST

Boat Found In Dapoli: दापोलीत समुद्र किनारी शुक्रवारी एक बोट आढळल्यानं खळबळ उडाली होती. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीबाबतची माहिती प्रशासनाला दिली होती

दापोलीत सापडलेल्या बोटीबाबत तटरक्षक दलाने दिली मोठी माहिती
दापोलीत सापडलेल्या बोटीबाबत तटरक्षक दलाने दिली मोठी माहिती (ANI)

Boat Found In Dapoli: रत्नागिरीत दापोलीत शुक्रवारी एक संशयास्पद बोट सापडल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी प्रशासनाला दिली होती. याप्रकरणी तटरक्षक दलाच्या मदतीने चौकशी करण्यात आली. आता तटरक्षक दलाने बोटीबाबत मोठा खुलासा केला आहे. दापोलीत समुद्र किनाऱ्यावर आढळलेली बोट ही संशयास्पद नसल्याचं तटरक्षक दलाने म्हटलं आहे. तसंच ही बोट विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेलं जहाज पार्थवरील लाइफ क्राफ्टचा एक भाग आहे असंही स्पष्ट केलं आहे.

तटरक्षक दलाने बोट संशयास्पद नसल्याचं सांगताना नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन केलं आहे. गेल्या आठवड्यात विजयदुर्ग किनाऱ्यावर पार्थ नावाचं जहाज बुडालं होतं. त्या जहाजाच्या लाइफ क्राफ्टचा हा भाग आहे. जेव्हा पार्थ जहाज बुडालं होतं तेव्हा याच लाइफ क्राफ्टद्वारे जहाजावरील १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती अशी माहिती तटरक्षक दलाने दिली आहे.

पार्थ जहाज हे दुबईहून बेंगलोकरकडे जात होते. तेलवाहतूक करणारं हे जहाज १६ सप्टेंबरला विजयदुर्ग किनाऱ्याजवळ बुडालं होतं. त्यावेळी जहाजावर असणाऱ्या सर्व कर्माचाऱ्यांना तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढलं होतं. जहाजाच्या तळाला छिद्र पडल्यानं जहाज बुडायला लागलं होतं. तेव्हा ही बाब लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाला याची माहिती दिली होती. त्यानंतर रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाने कर्मचाऱ्यांच्या बचावकार्याची मोहिम पार पाडली होती.

दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यात रायगडमध्ये संशयित बोट आढळली होती. तेव्हा त्या बोटीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे असल्यानं खळबळ उडाली होती. मुंबईसह राज्यात हाय अलर्टही जारी केला गेला होता. मात्र तपासानंतर बोट ऑस्ट्रेलियातील एका महिलेची असल्याचं समोर आलं होतं. तसंच बोटीमुळे कोणताही धोका नसल्याचं निष्पन्न झाल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग