Dharavi news : धारावीतील मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई मुंबई महापालिकेनं सहा दिवसांसाठी थांबवली आहे. स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मशिद पाडण्यास विरोध करणारे स्थानिक लोक आता कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार आहेत.
धारावीतील मेहबूब-ए-सुबानी मशिदीचं काही बांधकाम बेकायदा असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचं पथक आज सकाळी कारवाईसाठी तिथं पोहोचलं होतं. मात्र, या पाडकामाला स्थानिकांनी विरोध केला. मोठ्या संख्येनं जमलेल्या जमावानं महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचाही फोडल्या. त्यामुळं तणाव निर्माण झाला होता.
कारवाई थांबेपर्यंत रस्त्यावरच ठिय्या देण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. आंदोलक व मुंबई महापालिका प्रशासनाची बैठक झाली. त्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेनं ही कारवाई पुढचे ६ ते ८ दिवस थांबवण्याचं आश्वासन दिलं. दरम्यानच्या काळात मशिदीवरील कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी आंदोलक न्यायालयात जाणार आहेत.
पोलीस व महापालिका प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांच्या प्रतिनिधीनं ही माहिती दिली. ही मशीद अनेक वर्षे जुनी आहे. ती पाडली जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. या कारवाईला कायमची स्थगिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. प्रयत्न करणं आमचं काम आहे, यश देणं अल्लाहच्या हाती आहे, असं आंदोलकांच्या नेत्यांनी सांगितलं.
धारावीत जाती-धर्माचा किंवा हिंदू-मुस्लिम असा कुठलाही वाद नाही. कोणी तसा वाद पेटवण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही सगळे एक आहोत. धारावीकर आहोत, असं आंदोलकांच्या नेत्यांनी सांगितलं. तसंच, सर्वांनी आपापल्या घरी जावं व शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलं.