मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काम केलं तरी पगार शून्य, BMC मध्ये बायोमेट्रिक हजेरीने गोंधळ; कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

काम केलं तरी पगार शून्य, BMC मध्ये बायोमेट्रिक हजेरीने गोंधळ; कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 29, 2022 02:23 PM IST

BMC Biometric Issue: कर्मचाऱी आणि अधिकाऱ्यांच्यावतीने द म्युनिसिपल युनियन संघटनेनं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसंच याप्रकऱणी तातडीने पावले उचलून कपात रद्द करावी व योग्य ते वेतन द्यावे अशी मागणी केली आहे.

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

BMC Biometric Issue: मुंबई महापालिकेच्या कर्मचारी, अधिकारी यांना ऑगस्ट महिन्याचे १ सप्टेंबर रोजी देण्यात येणाऱ्या वेतनात मोठी कपात करण्यात आल्याची माहिती सॅप सस्टिममध्ये दिसून आली आहे. बायोमेट्रिक प्रणालीत असलेल्या त्रुटीमुळे हा प्रकार घडला असून याचा फटका ऐन सणासुदीच्या दिवसात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बसणार आहे. याबाबत कर्मचाऱी आणि अधिकाऱ्यांच्यावतीने द म्युनिसिपल युनियन संघटनेनं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसंच याप्रकऱणी तातडीने पावले उचलून कपात रद्द करावी व योग्य ते वेतन द्यावे अशी मागणी केली आहे.

महापालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशिन्स लावली गेली आहेत. मात्र त्यात बिघाड आहे, तसंच काही ठिकाणी इंटरनेट सुविधा नसल्यानं याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. मशिन्स बंद पडत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद यंत्रणेत होत नाही. यामुळेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम कापण्यात येत असल्याचा दावा युनियनने केला आहे. गणेशोत्सव सुरू होत असून यातच जर वेतन कपात झाली तर प्रचंड असंतोष निर्माण होईल आणि उत्सवसुद्धा योग्यपद्धतीने साजरा करणार नाही असंही युनियनने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे २० ते २५ हजार रुपये कापण्यात आले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचा पगार शून्य रुपये इतका आला आहे. काम केल्यानतंरही केवळ बायोमेट्रिक मशिन्समुळे कामगारांच्या हजेरीची नोंद न झाल्याचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करू नये अशी विनंतीसुद्धा करण्यात आली आहे.

बयोमेट्रिक हजेरी पगाराशी जोडण्यात येऊ नये. तसंच यासंदर्भात चर्चा करून प्रशासनाने मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने दिला आहे. मुंबई पालिकेच्या कार्यालयात बायोमेट्रिक मशिन्सची संख्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे. २० कर्मचाऱ्यांमागे एक मशिन असा आदेश होता, पण प्रत्यक्षात ७० कर्मचाऱ्यांसाठी एक मशिन उपलब्ध आहे. त्यामुळे हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. तर बऱ्याचदा इंटरनेट कनेक्शन, सर्व्हर कनेक्टिव्हीटीचे प्रॉब्लेम येतात असंही युनियनने म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या