Raj Thackeray : शिवतीर्थावर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : शिवतीर्थावर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

Raj Thackeray : शिवतीर्थावर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

Published Mar 21, 2024 04:59 PM IST

MNS Padwa Melava shivaji Park : ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे शिवतीर्थावरून राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? याची उत्सुकता आहे.

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

मनसेचा पाडवा मेळावा यंदा ९ एप्रिल रोजी मुंबईमधील शिवतीर्थावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे या मेळाव्यात आपली लोकसभेबाबतची रणनिती स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने व देशात आचारसंहिता लागू झाल्याने मनसेच्या पाडवा मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता ९ एप्रिल रोजी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कवर मैदानावर होणाऱ्या मनसे पाडवा मेळाव्याला मुंबई पालिकेने परवानगी दिली आहे. आता महायुतीच्या उंबरठ्यावर असलेले राज ठाकरे शिवाजी पार्कवरून काय घोषणा करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपांबाबत घटक पक्षांच्या बैठकांवर बैठका होत असताना काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत भेट घेतली होती. दोघांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितले. आता मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या असून महायुतीत त्यांना केवळ १ जागा ऑफर केल्याचे समजते. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे काय घोषणा करणार? याची राज्यातील जनतेला उत्सूकता आहे.

दरम्यान महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटक पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी वांद्यातील हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. मात्र या बैठकीला महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार उपस्थित नव्हते.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार या बैठकीला का नव्हते? मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भात अजित पवार यांचा विरोध आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राज ठाकरे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर