मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. बोरिवली टेकडी जलाशयाचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे काम ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण,आर उत्तर विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच त्यानंतर पुढील दोन दिवस गढूळ पाणी येणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे तसेच नागरिकांनी पाणी उकळून घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.
वैतरणा जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे ४ व ५ जानेवारी या दोन दिवस मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा बंद राहिल्यानंतर आता पुन्हा ९ तारखेला मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील एल व एस विभागात काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिला होता तर विभागात १० टक्के पाणी कपात केली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभागातील बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यजवळीलबोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ०२ ची संरचनात्मक तपासणी मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे.
त्यामुळेबोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. आर / दक्षिण,आर / मध्य व आर / उत्तर या विभागात पाणीपुरवठा हा फक्त बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ३ द्वारे करण्यात येणार आहे.