मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS-shinde camp Alliance: मनसे-शिंदे गटाच्या युतीची चर्चा; राज ठाकरे यांनी दिले ‘हे’ आदेश

MNS-shinde camp Alliance: मनसे-शिंदे गटाच्या युतीची चर्चा; राज ठाकरे यांनी दिले ‘हे’ आदेश

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 14, 2022 11:31 AM IST

Sandeep Deshpande on MNS-Shinde Group Alliance: मुंबईसह आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप किंवा शिंदे गटाशी युती करणार का, याचं उत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

Sandeep Deshpande on MNS-Shinde Group Alliance: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोनदा झालेल्या भेटीनंतर मनसे व शिंदे गटातील युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर खुलासा केला आहे. राज ठाकरे यांचे आदेश नेमके काय आहेत याची माहितीही दिली आहे.

शिवसेनेतील बंडाळी आणि राज्यातील सत्ताबदलानंतर मनसेला मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय संधी दिसू लागली आहे. त्यामुळंच पुढील वाटचालीबाबत मनसेनं नव्यानं चाचपणी सुरू केली आहे. विशेषत: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर मनसेचं लक्ष आहे. भाजपनंही मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका घ्यायची हेच दोन्ही पक्षांचं ध्येय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं दोन्ही पक्षाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळं शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चाही रंगल्या होत्या.

या सगळ्या चर्चा आणि शक्यता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेटाळून लावल्या आहेत. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. आगामी सर्व महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहेत. मुंबईतही सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. तसे राज ठाकरे यांचे आदेश आहेत. त्यामुळं मुंबईत आम्ही २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, असं देशपांडे म्हणाले.

'मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. सध्या कुणाही सोबत जाण्याचा आमचा निर्णय झालेला नाही. यापूर्वी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करून दिली.

बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत!

दसरा मेळाव्यावरून शिवसेना व शिंदे गटात सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे पुढं नेतायत. त्यामुळं कोणाचा मेळावा कुठं होतो ह्याला फार महत्त्व नाही,' असं ते म्हणाले.

WhatsApp channel