मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMCने खरेदी केलेल्या ३५ लाखांपैकी दीड लाख राष्ट्रध्वज सदोष

BMCने खरेदी केलेल्या ३५ लाखांपैकी दीड लाख राष्ट्रध्वज सदोष

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 10, 2022 11:31 AM IST

Har Ghar Tiranga: भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार आहे.

हर घर तिरंगा
हर घर तिरंगा (फोटो - अमित शर्मा)

Har Ghar Tiranga: देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाचे वितरण घरोघरी करण्यात येत आहे. महापालिकेनं यासाठी जवळपास ३५ लाख ध्वजांची खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर महापालिकेने खरेदी केलेल्या ३५ लाख ध्वजांपैकी तब्बल दीड लाख ध्वज हे सदोष असल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कार्यालयांना राष्ट्रध्वज पाठवण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर दीड लाख राष्ट्रध्वज सदोष आढळले आहेत. आता हे सदोष राष्ट्रध्वज पुन्हा बदलून घेण्यात येतील.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकावावा. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात अशा सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे असा हेतू या अभियानामागे आहे. मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत मुंबई महापालिकेकडून ३५ लाख ध्वजांची खरेदी करण्यात आले आहेत. आतापर्यंत हे सर्व ध्वज महापालिकेला मिळाले आहेत. प्रत्येक विभागाला देण्यात येणाऱ्या ध्वजांची तपासणी करून दोष असलेले ध्वज बाजूला काढले जातात. त्यानतंर सुस्थितीतील ध्वजांचे वितरण घरोघरी जाऊन केले जाते. आतापर्यंत सुमारे २६ लाख ध्वजांचे वितरण जनतेला करण्यात आले आहे. तर सदोष असलेले दीड लाख ध्वज पुन्हा एकदा खरेदी केलेल्या कंपनीकडे पाठवण्यात आले आहेत. दीड लाख सदोष असलेले ध्वज बदलून नवीन देण्यात येत असून हे नवीन ध्वजही रविवारपर्यंत महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे.

सदोष ध्वजांमध्ये काही ध्वजांचा आकार कमी, ध्वजाच्या मध्यभागी असणारं अशोक चक्र एका बाजूला, काही ध्वजांना छिद्र किंवा इतर कारणांमुळे ते जनतेच्या हातात जाणार नाहीत यासाठी महापालिकेनं काळजी घेतली आहे. महापालिकेकडून शुक्रवारच्या आधीच राष्ट्रध्वजांचे वितरण जनतेला करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरी तिरंगा फडकावण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग