Ganesh Visarjan Mumbai News Today : येत्या १८ सप्टेंबर पासून राज्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या शहरातील गणेश मंडळांनी प्रशासनाकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय प्रशासनाकडूनही यंदाच्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई हजारोंच्या संख्येने गणेश मंडळं असल्याने महापालिकेकडून तयारी सुरू आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबईतील तलावांची यादी तयार करण्यात येत आहे. परंतु आता मुंबईतील आरे कॉलनीतल्या तलावात गणेश विसर्जन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय दुग्ध वसाहत प्रशासनाने घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने दुग्ध वसाहतीतील संपूर्ण परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केला आहे. त्यानंतर आता या तलावात गणेश विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे.
मंगळवारी मुंबई महापालिका, गणेशोत्सव समन्वय समिती आणि आरे दुग्ध वसाहत प्रशासनाची एकत्रिक बैठक पार पडली. त्यात आरे कॉलनीतील तलावात गणेश विसर्जनास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच तलावात गणेश विर्जसन करण्यावर समन्वय समिती ठाम असल्याने प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीतील तलाव परिसराला ईएसझेड क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे. तरीदेखील आरे दुग्ध वसाहत परिसरात गणेश विसर्जन केलं जात होतं. पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन टाळण्यासाठी गणेश विसर्जनावर बंदी घालण्याची मागणी वनशक्ती संस्थेकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मंगळवारी बैठक घेत आरे दुग्ध वसाहत प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आरे कॉलनीतील तलावात गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि आरे कॉलनीतील गणेश मंडळांकडून विसर्जन करण्यात येत असतं. या तलावा शिवाय परिसरात विसर्जनासाठी कोणताही तलाव नाही. त्यामुळं कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण होईपर्यंत आरे कॉलनीतील तलावात गणेश विसर्जनाची सोय करून देण्याची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. नियम लागू करण्यात आल्यानंतरही या तलावात गणेश विसर्जन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आगामी काळात गणेश मंडळ आणि प्रशासनात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या