मुंबईतील काही भागात उद्या (३० ऑगस्ट) पाण्याचा ठणठणाट जाणवणार आहे. वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार असल्याने काही भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. शुक्रवार सकाळी १० ते मध्यरात्री १२ वर्यंत अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वांद्रे आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी बदलली जाणार आहे. त्याचबरोबर वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेली ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे ३० ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून सुरू केली जातील व रात्री उशिरापर्यंत चालू राहतील. या कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारणार आहे. एकंदरीतच एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी वांद्रे पश्चिमच्या काही भाग,वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग या भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.
खार दांडा परिक्षेत्र, खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही आदिचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. येथे दररोज सायंकाळी साडे पाच ते साडे आठ वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो.
त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेच्या काही भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे. येथे रात्री ९ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो.