बीडमधून ईद-उल-फित्रच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका मशिदीत रविवारी पहाटे स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने ठेवलेल्या जिलेटिन रॉडमुळे हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेवराई तालुक्यातील अर्ध मसाला गावातील मशिदीत पहाटे अडीच च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर मशिदीच्या आतील भागाचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने मशिदीत मागच्या बाजूने प्रवेश केला आणि तेथे जिलेटिनरॉड ठेवल्याने स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामप्रधानाने पहाटे चारच्या सुमारास तलवाडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कानवट व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक व नाशक पथकासह (बीडीडीएस) फॉरेन्सिक सायन्स पथकही घटनास्थळी दाखल झाले. बीड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संबंधित बातम्या