Anant Ambani wedding : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं होत आहे. जगभरातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यानं पुढचे चार दिवस इथल्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. हे लक्षात घेऊन गैरसोय टाळण्यासाठी १२ जुलै ते १५ जुलै पर्यंत बीकेसीतील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रिलायन्स समूहाच्या मालकीचं जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बीकेसीमध्ये आहे. इथंच अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या निमित्त १२ जुलै ते १५ जुलै दरम्यान दुपारी १ ते मध्यरात्री या वेळेत इथले रस्ते केवळ लग्न समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुले राहणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय आणि भारतीय सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळं हा उत्सव सार्वजनिक कार्यक्रम मानला जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून भारतात आणि परदेशात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा सुरू होता. मुकेश आणि नीता अंबानी यांनी पहिल्यांदा मार्चमध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये आणि नंतर युरोपमधील लक्झरी क्रूझवर दोन भव्य समारंभांचं आयोजन केलं होतं. गेल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळे समारंभ पार पडल्यानंतर आता शुक्रवारी अनंत व राधिका विधीवत विवाहबंधनात अडकणार आहेत.
जगप्रसिद्ध गायिका व मॉडेल किम कार्दशियन, तिची बहीण क्लो कार्दशियन, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली जे-योंग, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांसारखे जागतिक स्तरावरील मान्यवर या विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गेल्या आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबरने शेकडो पाहुण्यांसाठी परफॉर्म केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळं बीकेसीतील हॉटेल्सचे खोलीचे भाडे एका रात्रीसाठी ९१ हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
अंबानींच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १२ ते १५ जुलै रोजी कुर्ला एमटीएनएल रोडवर लक्ष्मी टॉवर जंक्शन ते धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन-3, इंडियन ऑईल पेट्रोल पंप आणि डायमंड जंक्शन ते हॉटेल ट्रायडेंट पर्यंत वाहनांना प्रवेश नसेल. त्याऐवजी बीकेसीची वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शनवर डावीकडे वळवून डायमंड गेट क्रमांक ८ कडे न्यावीत, त्यानंतर नाबार्ड जंक्शनवर उजवीकडे वळावे, डायमंड जंक्शनकडे जावे आणि धीरूभाई अंबानी चौक आणि इंडियन ऑईल पेट्रोल पंप मार्गे बीकेसीच्या दिशेने जावे, असं सांगण्यात आलं आहे.
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन आणि डायमंड जंक्शनकडून बीकेसी कनेक्टर पुलाकडे येणाऱ्या वाहनांना धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू/इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर प्रवेश दिला जाणार नाही. या वाहनांनी नाबार्ड जंक्शनवर डावीकडे जावे, डायमंड गेट क्रमांक ८ वरून पुढे जावे, लक्ष्मी टॉवर जंक्शनवर उजवीकडे वळावे आणि बीकेसीला जावे, असं सुचवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या