भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती, आताचा आकडा किती?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती, आताचा आकडा किती?

भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती, आताचा आकडा किती?

Oct 30, 2024 11:45 AM IST

Parag Shah Net Worth : भाजपचे मुंबईतील घाटकोपर विधानसभेचे उमेदवार पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती
भाजपचे पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

पराग शाह यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ३३८३.०६ कोटी रुपये आहे. त्यात पराग शाह यांच्या नावावरील २१७८.९८ कोटींची तर पत्नीच्या नावावरील ११३६.५४ कोटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षांत पराग शाह यांच्या संपत्तीत ५७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ५५०.६२ कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून त्यात २२८२ कोटींची वाढ झाली आहे.

कोण आहेत पराग शाह?

पराग शाह हे घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत. शाह हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. गुजरात आणि चेन्नईमध्ये त्यांचे गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी ६९० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांची पत्नी मानसी यांच्याकडंही कोट्यवधींची संपत्ती असून त्यात व्यावसायिक, निवासी आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते.

पराग शाह यांना राखी जाधव यांचं आव्हान

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार व मंत्री प्रकाश मेहता हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळं तिथली उमेदवारीची घोषणा रखडली होती. मात्र, पक्षानं पराग शाह यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार राखी जाधव यांच्याशी होणार आहे. राखी जाधव या माजी नगरसेविका आहेत. शाह यांना उमेदवारी मिळाल्यामुळं मेहता गट नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळं पराग शाह यांच्यासाठी ही लढत काहीशी कठीण झाली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर