मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi Handi 2022: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार, फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

Dahi Handi 2022: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार, फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 11:24 PM IST

मुंबई महापालिकेतली (BMC Election) भ्रष्टाचाराची हंडी फोडणार म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे व शिवसेनेला आव्हान दिले आहे.

फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान
फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई – दहीहंडीनिमित्त राज्यभरात उत्साह व जल्लोषाचे वातावरण आहे. मुंबईतही अनेक राज्य पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याने शहरात (Mumbai Dahi Handi) उत्साह दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election) यंदा असल्याने भाजपकडून मुंबईत दहीहंडीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई, ठाणे परिसरातील दहीहंडीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून जोरदार राजकीय टोलेबाजी करत आहेत. भाजप नेते प्रविण दरेकर  यांच्या दहिसरमधल्या दहीहंडीमध्ये फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतली (BMC Election) भ्रष्टाचाराची हंडी फोडणार म्हणत ठाकरे व शिवसेनेला आव्हान दिले आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सव यावरील सर्व निर्बंध दूर झाले आहेत, त्यामुळे आता कसं सर्व खुले-खुले वाटत आहे. अशाच प्रकारे नवरात्र उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. आता दहीहंडीमध्ये सहभागी होणारे गोविंदा हे फक्त गोविंदा राहिले नाहीत, तर ते आता खेळाडू झाले आहेत. गोविंदा या खेळाडूंना सर्व सवलती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी १० लाखांचे विमा कवच दिले आहे तर मुंबई भाजपाच्यावतीने १० लाखाचा विमा देण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदांना आता डबल विमा कवच मिळाले आहे.

फडणवीस म्हणाले की, दहीहंडी फोडल्यानंतर या हंडीमधील मलई आपल्याला सर्वांना वाटायची आहे. लवकरच आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार आहोत आणि त्यामधील विकासाची मलई ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या रुपात पोहचविणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले आहे. 

दहिसरमधील अशोकवन येथील दहिहंडी उत्सवात १ लाख ११ हजार १११ रुपयांची दही हंडी लावण्यात आली होती. सुमारे २५० गोविंदांनी दही हंडीला सलामी दिली. 

IPL_Entry_Point