
Sanjay Raut on Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जात असल्याच्या चर्चा काही केल्या थांबत नसतानाच आता राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनं वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
'राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत. दिल्लीत त्यासाठी बरंच काही सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सरकारला सध्या धोका नसला तरी मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी नुकतंच केलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता भुजबळ यांची माहिती योग्य आहे. दिल्लीत तशा हालचाली सुरू आहेत, असं राऊत म्हणाले.
'हे जे मुख्यमंत्री आहेत ते राज्य चालवण्यात आणि भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे, ते साध्य करण्यात अपयशी ठरलेत. भाजपला आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्याचा वापर करण्यात आला. ते काम पूर्ण झालं. पण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात भाजपला ताकद देण्यात हे मुख्यमंत्री पुरते अपयशी ठरलेत. हे सरकार आल्यापासून मिंधे गटाबरोबरच भाजपही रसातळाला जातोय. बदनाम होतोय, असं राऊत म्हणाले.
शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी सांगतील बाळासाहेब ठाकरेंची. पण आपल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरून ते मतांसाठी पाकिस्तानचा आधार घेत असल्याची टीका होत होती. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे काहीही चुकीचं बोलले नाहीत. उलट पाकिस्तानचा उल्लेख न करता मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात, असं आव्हान राऊत यांनी दिलं.
'अडीच वर्षांत उद्धव ठाकरे सरकारनं घेतलेले निर्णय सर्वसमावेशक होते. सर्वांना सोबत घेऊन राज्याचा गाडा रुळावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कोरोनाचं संकट तीव्र होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय मोलाचे होते, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.
संबंधित बातम्या
