मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BJP Muslim outreach: ‘हार्ट टू हार्ट’ मोहिमेद्वारे राज्यात भाजप मुस्लिम मतदारांशी संपर्क वाढवणार

BJP Muslim outreach: ‘हार्ट टू हार्ट’ मोहिमेद्वारे राज्यात भाजप मुस्लिम मतदारांशी संपर्क वाढवणार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 10, 2023 08:53 PM IST

भाजप आणि मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी राज्यात मुस्लिमांसोबत ‘हार्ट टू हार्ट’ संवाद करण्याचे आता भाजपने ठरविले आहे. (Maharashtra BJP to launch heart to heart campaign to attract Muslim voters)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष आहे असा संभ्रम महाराष्ट्रात अनेक मुस्लिमबहुल शहरांमध्ये विरोधकांकडून निर्माण करण्यात आला आहे. भाजप आणि मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी राज्यात मुस्लिमांसोबत ‘हार्ट टू हार्ट’ संवाद करण्याचे आता भाजपने ठरविले आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात ६० हजार घरांमध्ये भाजप ‘हार्ट टू हार्ट’ संपर्क मोहीम राबवणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मालेगाव जिल्हा संघटनात्मक दौऱ्यावर बावनकुळे मालेगाव येथे आले होते. मालेगाव येथे भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची रॅली काढून स्वागत केले. यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बावनकुळे म्हणाले, ‘भारत हा विविध समाज आणि धर्म मिळून तयार झालेला देश आहे. भारताला मजबूत करण्यासाठी सर्व समाजाने योगदान दिले आहे. म्हणून आज भारत एकसंघ देश राहिला आहे. भाजप आणि मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजापर्यंत पोहण्याची आवश्यकता असल्याचे बावनकुळे म्हणाले. भाजप कार्यकर्ते जोपर्यंत मुस्लिमांपर्यंत पोहचत नाही, ही दरी कमी होणार नाही. यासाठी भाजप कार्यकर्त्यांना मुस्लिमांशी ‘हार्ट-टू-हार्ट’ आणि ‘मॅन-टू-मॅन’ संबंध ठेवावे लागतील. शिवाय समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही याची भाजप कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे बावनकुळे म्हणाले.

भारतात राहणारा व भारतीय संस्कृतीवर विश्वास असलेली कोणत्याही धर्माची व्यक्ती भाजपा कुटुंबाचा सदस्य आहे. भाजपचे अनेक नगरसेवक मुस्लिम आहेत. काही खासदार होते. मात्र विरोधकांकडून भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष असल्याचा जाणीवपूर्वक प्रचार केला जात असून भाजप आता मुस्लिम समाजाला सोबत घेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात संपर्क मोहीम राबवणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या