Beed Sarpanch News: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येला एक महिला उलटून गेला, तरीही याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींसह एका फरार आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास वेगाने सुरू असताना बीड येथील परळी तालुक्यात टिप्परच्या धडकेत एका माजी सरपंच ठार झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात आहे की घातपात आहे? याप्रकरणी पोलीस तपास करत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सौंदाणा माजी सरपंच यांचे नाव आहे. अभिमन्यू क्षीरसागर शनिवारी रात्री परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावरून जात असताना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ९.२० वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्युवर बोलताना सुरेश धस म्हणाले की, ही घटना रात्री नऊ वाजून २० मिनिटांनी घडली. परळी भागात बोगस आणि अवैध राखेची लूट सुरू आहे. रात्री घडलेली घटना अपघात आहे की घातपात? याचा शोध लागायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात परळीची चर्चा सुरू आहे. मात्र, तरीही टिप्पर बंद झाले नाहीत. या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी मासाजोगचे सरपंच देशमुख यांचे पवनचक्की प्रकल्प चालविणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून खंडणीचा प्रयत्न रोखण्यासाठी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता. खुनाचा गुन्हा आणि या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीच्या विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. या हत्येचा राज्यव्यापी निषेध करण्यात आला आहे. या हत्येनंतर बीडमधील परळीचे आमदार मुंडे यांच्यावर विरोधी पक्षआणि सत्ताधारी महायुतीच्या काही नेत्यांकडून टीका होत असून सरपंचाच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा त्यांचा निकटवर्तीय आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या