मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena vs BJP : ‘माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंच्या..’, चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेनेवर पलटवार
uddhav thackeray vs chandrashekhar bawankule
uddhav thackeray vs chandrashekhar bawankule (HT)

Shiv Sena vs BJP : ‘माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंच्या..’, चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेनेवर पलटवार

22 September 2022, 11:23 ISTAtik Sikandar Shaikh

Shiv Sena vs BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आडनावावरून टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

uddhav thackeray vs chandrashekhar bawankule : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल गोरेगावात गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आडनावावरून टीका केली होती. ही टीका बावनकुळेंना काही रुचलेली नाही. त्यामुळंच आता त्यांनी उद्धव ठाकरेंना एकामागून एक ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही, गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

अमित शहांवर टीका करण्यापूर्वी ठाकरेंनी आधी स्वतःला सांभाळावं, विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलाय ते आधी पाहावं, भाजपामुळं विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, विश्वासघातामुळं तुम्हाला जनतेनं वारंवार धडा शिकवला आहे. ग्रामपंचायतीत काय झालं ते पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे करण्यात येईल, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.

काल गोरेगावमधील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला, त्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, भारतीय जनता पार्टीत उपऱ्यांचा बाजार भरलेला आहे, त्यामुळं भाजपमध्ये ओरिजनल कोण आहे, हेच कळत नाहीये. इतके उपरे घेतले की तुमचा बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली होती. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.