Organiser : अजित पवार यांच्याशी युती केल्याचा भाजपला फटका; RSS च्या मुखपत्रातून दावा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Organiser : अजित पवार यांच्याशी युती केल्याचा भाजपला फटका; RSS च्या मुखपत्रातून दावा

Organiser : अजित पवार यांच्याशी युती केल्याचा भाजपला फटका; RSS च्या मुखपत्रातून दावा

Updated Jun 12, 2024 03:54 PM IST

Organiser on BJP ajit pawar alliance : भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांना फोडून त्यांच्या पक्षासोबत युती करणं ही चूक होती, असं आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायजर'मधील लेखात नमूद करण्यात आलं आहे.

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपचं नुकसान झालं; RSS च्या मुखपत्राचा दावा
अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपचं नुकसान झालं; RSS च्या मुखपत्राचा दावा (Deepak Salvi)

Organiser on BJP ajit pawar alliance : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून नवं सरकार कामाला लागलं असलं तरी निकालाचं कवित्व सुरूच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र 'ऑर्गनायजर'मधील एका लेखात निकालाचं विश्लेषण करताना पक्षाच्या काही चुकीच्या निर्णयांवर व कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासावर बोट ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांना सोबत घेण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळं युतीमध्ये अजित पवारांचं भवितव्य काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमतासह सत्ता मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला. भाजपला स्वबळावर सरकार आणता आलं नाही. त्यामुळं आरएसएससह भाजपच्या समर्थकांमध्ये काहीशी निराशेची भावना आहे. हे कसं झालं यावर आता विश्लेषण सुरू झालं आहे. संघाचे स्वयंसेवक रतना शारदा यांनी लिहिलेल्या लेखातून पक्षाच्या काही निर्णयांना यासाठी दोष दिला आहे.

भाजप बहुमतापासून दूर राहण्यास उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील निकाल कारणीभूत ठरले आहेत. महाराष्ट्रातील निकालाची कारणमीमांसा करताना भाजपचं 'अति राजकारण' अंगलट आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडं पूर्ण बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती, असा प्रश्न लेखात उपस्थित करण्यात आला आहे.

शरद पवारांचा प्रभाव असाही संपला असता!

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद होत राहिले असते तर शरद पवार यांचा प्रभाव पुढच्या दोन-तीन वर्षांत असाही संपून गेला असता. मात्र, अजित पवारांना फोडल्याचा परिणाम उलटा झाला. भाजपच्या समर्थकांनाही हे आवडलं नाही. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध वर्षानुवर्षे लढलो त्यांच्याशीच युती करावी लागली. भाजपची प्रतिमा तिथं पूर्ण खालावली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी इतकी वर्षे केलेला संघर्ष वाया गेला. भाजप इतरांसारखाच केवळ एक पक्ष बनून राहिला, असं लेखात नमूद करण्यात आलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं संधी साधली!

आरएसएसच्या मुखपत्रानं अजित पवार यांच्याबाबत हे मत व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं संधी साधली आहे. अजित पवार यांना सोबत घेणं ही चूक होती हे कळल्यामुळं आता विधानसभेत त्यांच्या गटाला बेदखल केलं जाईल. त्यांच्या सोबत आघाडी करायची की नाही यावरही भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू झालं असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर