मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Elections : भाजप-शिंदे गटाचा वरचष्मा; पहिल्याच सामन्यात शतकी मजल

Gram Panchayat Elections : भाजप-शिंदे गटाचा वरचष्मा; पहिल्याच सामन्यात शतकी मजल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 05, 2022 06:04 PM IST

gram panchayat elections result : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचं दिसून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचावरचष्मा
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचावरचष्मा

मुंबई -राज्यातील २७१ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज लागले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल (gram panchayat elections result) लागले असून अनेक पक्षांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका जरी पक्षाच्या नावाने होत नसल्या किंवा यात पक्षीय चिन्हाचा वापर नसला तरी दिग्गज नेत्यांचा सहभाग असतोच. त्यामुळे याचे मुल्यमापन पक्षाच्या पातळीवर केल्यास शिवसेनेचा फुटीर शिंदे गट व भाजपने शतकी मजल मारून दमदार कामगिरी केली आहे. तर प्रचंड पडझडीनंतर शिवसेनेनेही सोलापूर जिल्ह्यात चमकदार कामगिरी केली आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचं दिसून येत आहे. २७१ पैकी भाजपने ८२ तर शिंदे गटाने ४० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे. राज्यात ५३ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचं पॅनेल जिंकून आले आहे.

भाजपनंतर सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला -

शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे गट आणिशिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमने-सामने आला. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपा ८२, राष्ट्रवादी ५३, शिंदे गट ४०, शिवसेना २७ तर काँग्रेस २२ जागांवर विजयी झाले. इतरांना ४७ जागा मिळाल्या आहेत.शिंदे गटाने मराठवाड्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. धुळे जिल्ह्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीत शिवसेनेला ३ हून अधिक, शिंदे गटाला २० हून अधिक तर भाजपाने १५ हून अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. काँग्रेसही १० ग्रामपंचायतीवर विजयी झाली आहे.

औरंगाबादमध्ये १२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा -

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला नामोहरण करत शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकावला आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला १५ पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालय. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.

औरंगाबादेत शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांकडे सगळ्यांचे लक्ष होते. शिंदे गटाने वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १२ जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. सिल्लोडमध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

 

सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे गटाला यश -
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या