BJP election manifesto 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत घोषणांचा पाऊस पडला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी यापूर्वी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे भाजप आपला जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांचा मास्टर प्लॅन यात मांडण्यात आला आहे.
भाजपने आज मुंबईत जाहीर केलेल्या संकल्पपत्र या जाहीरनाम्यात विविध घोषणा केल्या आहेत. यात मतदारांच्या दृष्टीने आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये करण्यापासून ते कर्जमाफी अशा अनेक घोषणा यात करण्यात आल्या आहेत. या संकल्पपत्राच्या अनावरनावेळी, भाजपाचे नेते व गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील १८ विभागप्रमुखांच्या समितीने हे संकल्पपत्र तयार केले आहे. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, भाजपचा संकल्प हा महाराष्ट्रच्या प्रगतीचा विकासाचा व छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत असून नागरिकांचे उत्पन्न देखील वाढले आहे.
भाजपच्या संकल्पपत्रात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी भावांतर योजना, वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता २१०० रुपये करणार, लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० करणार, प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन, २५ लाख रोजगार निर्मिती करणार, १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार, एरोनॉटिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी निर्माण करणार, शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी तयार करणार, २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार, महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार, गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार, १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, युवकांसाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार, गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण तयार करणार.