BJP proteste against jitendra awhad : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी' ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे.
आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी आज भाजप, आणि अजित पवार गटातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या विरोधात या प्रकरणी मुंबई, पुणे, संगमनेर, धुळे या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
पुण्यात बंडगार्डन पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भीमराव बबन साठे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संगमनेर येथील पोलिस ठाण्यात देखील आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ५०४ अन्वये शांततेचा भंग करण्याच्या हेतूने अपमान केल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरात येथे देखील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला काळे फसण्यात आले. तर मीरा भाईंदर येथे देखील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आव्हाड यांच्या फोटोला चपला मारत जोडे मार आंदोलन केले आहे.
धुळे येथेही जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात अडकवून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी केली.
संबंधित बातम्या