मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Vs BJP : आदित्य ठाकरेंना घेरण्याचा भाजपचा प्लान; वरळीत दहीहंडीचं आयोजन

Shivsena Vs BJP : आदित्य ठाकरेंना घेरण्याचा भाजपचा प्लान; वरळीत दहीहंडीचं आयोजन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 16, 2022 02:06 PM IST

BJP Dahihandi in Aaditya Thackeray constituency : शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता भाजपनं आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे. याशिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनंही वरळीत भाजपनं रणनिती आखली आहे.

aditya thackeray and devendra fadnavis
aditya thackeray and devendra fadnavis (HT)

BJP Dahihandi in Worli: भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपनं मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आता मुंबईत भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं असलं तरी अजून मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात आहे, त्यामुळंच आता यावेळी भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यातच आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपनं दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं ठाकरेंसह शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनिती भाजपनं आखली आहे.

येत्या काही दिवसांत दहीहंडी सण साजरा केला जाणार असल्यानं ज्या जांभोरी मैदानावर शिवसेनेचे नेते सचिन अहिर हे सातत्यानं दहीदंहीचा कार्यक्रम घेत होते, तेच मैदान आता शिवसेनेच्या आधी भाजपनं बुक केलं आहे. त्यामुळं आता भाजपनं मुंबई महापालिकेसाठी 'मिशन वरळी' सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता ठाकरेंची शिवसेना भाजपच्या या रणनितीला कसं उत्तर देणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी भाजपची रणनिती?

शिवसेनेत बंड झाल्यापासून आदित्य ठाकरेंनी सातत्यानं बंडखोर आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात मेळावे घेत बंडखोर नेते शिंदेंसह भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं होतं. त्यामुळंच आता भाजपनं आदित्य ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात अडचणीत आणण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडी मिळवण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे.

वरळीचं राजकीय समीकरण काय?

मुंबईतील वरळी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण २०१४ पासून सातत्यानं या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार विजयी झालेला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा पराभव केला होता. त्यानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते वरळीतून लढतील, असं सर्वांना वाटत असतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी दिली होती. तिथून ते मोठ्या मताधिक्यानं विजयीदेखील झाले होते. त्यानंतर सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर घेण्यात आलं.

भाजपसाठी वरळी किती महत्त्वाची?

भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना आगामी महापालिकेत १५० हून अधिक जागा निवडून आणण्याचं टार्गेट दिल्याची माहिती आहे. त्यामुळं आता भाजपनं मुंबईत अनेक भागांमध्ये पक्षाला संघनात्मक मजबुती द्यायला सुरुवात केली आहे. याशिवाय मुंबईतील जे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात, तिथेही पक्षाच्या कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. याशिवाय वरळीत दहीहंडीचं आयोजन करून आदित्य ठाकरेंना मुंबईशिवाय वरळीतच अडचणीत आणण्याची भाजपची खेळी असल्याचं दिसून येत आहे.

दहीदंडी म्हणजे मुंबईचा उत्सव...

देशाची आर्थिक राजधानी गणेशोत्सवानंतर सर्वात जास्त उत्साहानं साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी आहे. मुंबईत विविध पक्षाचे अनेक नेते दहीहंडीचे लोकप्रिय कार्यक्रम घेत असतात, त्यात घाटकोपर, ठाणे, माहिम, मुलुंडसह वरळी आणि शहराच्या अनेक भागांमध्ये थरावर थर रचत दहीहंडी साजरी केली जाते. त्यामुळं या सणाला मुंबईच्या राजकारणात मोठं महत्त्व आहे.

IPL_Entry_Point