विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र महत्वाच्या खातेवाटपावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून एकनाथ शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. शिंदे यांनी भाजपकडे गृह आणि नगरविकास या महत्वाच्या खात्याची मागणी केली होती, असं सूत्रांचं म्हणण आहे. परंतु ही दोन्ही महत्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष नगरविकास खात्याचा एकहाती कार्यभार सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत संभ्रम कायम आहे.
आज, बुधवारी भाजपच्या दोन केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर दुपारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहचले. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दर्शवणारे पत्रे महायुतीच्या घटक पक्षांनी राज्यपालांना सादर केली. यावेळी झालेली पत्रकार परिषद खळ्या आणि कोपरखळ्यांनी गाजली. ‘मी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत विनंती केली आहे’ असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फडणवीस यांच्या या विधानावरून उपस्थित सर्वांना धक्का बसला. त्यावर ‘मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही याचा अद्याप माझा निर्णय झालेला नाही’ असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिली. यावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी नगरविकास खात्यावर नियंत्रण असणे भाजपला महत्वाचे वाटते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेदरम्यान या खात्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. खातेवाटपात गृह खाते इतर घटक पक्षाला देण्याबाबत भाजपने आधीच स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते राहणार आहे. गृह किंवा नगरविकास यापैकी एकही खाते मिळणार नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उद्या, गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत फार उत्सुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित बातम्या