Navi Mumbai news : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असता भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करून वाल्मीक कराडचे नाव घेत गंभीर आरोप केले आहे. ही घटना रायगडमधील कर्जत पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भरत जाधव असे या भाजपच्या माजी नगरसेवकांचे नाव असून ते नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
भरत जाधव यांनी आज रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन केलं. जाधव यांनी विष पिण्याच्या आधी एक व्हिडिओ काढला असून त्यात त्यांनी त्यांची फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी विष प्यायल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली असून त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भरत जाधव यांनी या व्हिडिओत मानसिक तणावात असल्याचं म्हटलं आहे. त्यातून हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. २५ वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं.
रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, ३०-४० पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. तब्बल तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले.
एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी ९० लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या. माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना. नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं.
या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत आहेत. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली. नरेंद्र झुरानी मला फसवत आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना माहिती आहे. दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते. बदनामी करायला, टार्गेट करायला मर्यादा असते. विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात, त्रास देतात. त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही.
सरकारने नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर 108 मधील केलेल्या कामांची चौकशी करावी. कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये, असे भरत जाद यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
संबंधित बातम्या