मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pritam Munde : कुस्तीपटूंच्या बाजूनं भाजपमधून आवाज वाढला; खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या...

Pritam Munde : कुस्तीपटूंच्या बाजूनं भाजपमधून आवाज वाढला; खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या...

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 01, 2023 10:46 AM IST

Pritam Munde on Protesting Wrestlers : लैंगिक शोषणाच्या विरोधात न्याय मागणाऱ्या महिला कुस्तीपटूंसाठी भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आवाज उठवला आहे.

Protesting Wrestlers
Protesting Wrestlers

Pritam Munde on Protesting Wrestlers : लैंगिक अत्याचाराविरोधात न्याय मिळावा म्हणून गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. खुद्द भाजपमधूनही आता आवाज उठू लागला आहे. हरयाणाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांच्यानंतर आता बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही आंदोलक कुस्तीपटूंबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महिनाभरापासून चाललेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडं मोदी सरकारनं साफ दुर्लक्ष केलं आहे. उलट पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. जागतिक पातळीवर दखल घेतली जाऊनही सरकारकडून वा भाजपकडून काहीही बोललं जात नव्हतं. आता मात्र भाजपचे खासदारही उघडउघड बोलू लागले आहेत.

बीडमधील एका पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे यांना महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं. 'एक महिला खासदार म्हणून नाही तर जन्मानं महिला असल्यानं मला वाटतं की कुठल्याही महिलेची अशी तक्रार येते, तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे. त्या तक्रारीची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे. योग्य यंत्रणेला अधिकार देऊन तक्रार योग्य की अयोग्य हे निश्चित केलं पाहिजे. तशी दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीत ही घटना स्वागतार्ह नाही, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

कुस्तीपटूंच्या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची मागणी करणार का या प्रश्नावरही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. 'चौकशी समितीची मागणी मी करण्याची गरज नाही. जागतिक कुस्ती महासंघानं यावर आधीच भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळं कारवाई करावीच लागेल. आता मी चौकशी समितीची मागणी केली तर तो केवळ प्रसिद्धीचा स्टंट होईल. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलीय त्यामुळं कारवाईची अपेक्षा आहे, असं त्यांनी नमूद केलं. कुस्तीपटूंच्या बाजूनं बोलणाऱ्या प्रीतम मुंडे या महाराष्ट्रातील पहिल्या भाजप खासदार आहेत.

WhatsApp channel