सोलापूर - भीमा साखर कारखाना निवडणुकीत (bhima sugar factory election) भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) पॅनलने विजयाची हॅट्रिक केली आहे. महाडिक गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे १५ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. याबरोबर अपक्षांचाही सुपडासाफ झाला आहे. या निवडणुकीत स्वत: धनंजय महाडिक आणि त्यांचे पूत्र विश्वराज महाडिकही रिंगणात होते.
भीमा कारखान्याच्या निवडणुकीत ‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात’ असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजन पाटील गटाचा १५-० ने धुव्वा उडवण्यात आला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिकांनी सलग तिसऱ्यांदा झेंडा फडकावला आहे. धनंजय महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना धूळ चारत महाडिक गटाने भीमा कारखान्यावर वर्चस्व राखले आहे.
महाडिक यांच्या पॅनेलने सुमारे साडेसहा हजारांच्या फरकाने १५ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार, तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनेल आमने-सामने आले होते. या निवडणुकीत ७९ टक्के मतदान झालं होतं. आज सोलापुरात मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाडिक यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत कारखाच्या इतिहास मोठा विजय नोंदवला आहे.