Anil Bonde on Rahul Gandhi : अमेरिकेतील एका मुलाखतीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरू झाली आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिका दौऱ्यात एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं होतं. 'भारतात आजही विषमता आहे. काही बाबतीत पक्षपात आहे. हा पक्षपात थांबला तरच आरक्षण संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, सध्या तरी तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
राहुल यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी त्यांचा निषेध केला होता. राहुल गांधींना आरक्षण नको आहे असं सांगण्याचा प्रयत्न भाजपनं केला होता. त्यानंतर काही नेत्यांनीही मतं मांडायला सुरुवात केली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. हे काम करणाऱ्यास ११ लाख इनाम देईन, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावरून गदारोळ उठला होता. काँग्रेसनं गायकवाड यांच्यासह महायुती सरकारलाही घेरलं होतं.
संजय गायकवाड यांच्याप्रमाणेच अनिल बोंडे हे देखील अधूनमधून वादग्रस्त बोलत असतात. आता त्यांनी आरक्षणाच्या निमित्तानं राहुल यांच्यावर टीका केली आहे. 'जीभ छाटण्याची भाषा योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले, ते भयानक आहे. असं जर विपरीत कोणी बोलत असेल. परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जिभेला चटके जरूर द्यायला पाहिजेत, असं बोंडे म्हणाले.
'भारतातील बहुजन समाजाला जे दुखावतात, त्या लोकांना काही गोष्टींची जाणीव करून द्यायला पाहिजे. मग ते राहुल गांधी असतो, ज्ञानेश महाराव असतो की श्याम मानव असोत. त्यांच्या जिभेला चटके देण्याची गरज आहे, असं बोंडे म्हणाले.
संजय गायकवाड यांनी राहुल यांची जीभ छाटण्याची भाषा केली तेव्हा भाजपनं त्यांच्या वक्तव्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता त्यांच्याच पक्षाचे खासदार बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळं भाजप आता काय भूमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.