Gopichand Padalkar News in Marathi: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या इंदापूर दौऱ्यावेळी त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. इंदापूरमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा होता. या मेळाव्यात मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे पडळकर यांच्याविरुद्ध मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे.
मराठा आणि ओबीसी समाजाचे समोरासमोर उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी समाजातील नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर गोपीचंद पडळकर परत जाताना मराठा समाज आणि पडळकर यांचा समाना झाला. त्यावेळी पडळकरांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली. या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा देखील दिल्या.
मात्र, मराठा समाजाने गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करणारे त्यांचेच लोक होते, असा आरोप मराठा समाजाने केला आहे. दुसरीकडे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच इंदापूर बंदचीही हाक दिली आहे.
ओबीसी एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रा.टी. पी. मुंडे, दौलतराव शितोळे, कल्याणराव दळे, राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मण हाके, पांडुरंग शिंदे, तानाजी धोत्रे यांसह ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित बातम्या