Sunil Kamble Slaps Jitendra Satav: पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयात विविध विकास कामानिमित्त होणाऱ्या उद्घाटन कोनशिलावर नाव नसल्याच्या रागातून भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तसेच उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांनाही मारहाण केल्याचे सांगितलेच जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी सरक असे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. आमदार सुनील कांबळे यांनी मंचावरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुनील कांबळे यांनी आज सकाळी जितेंद्र सातव यांना मारहाण केल्याचे समजत आहे. याप्रकरणी सातव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देणे टाळले. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.
या घटनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून संतापजनक प्रतिक्रिया दिली."काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी सत्तेचा माज दाखवला. भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो", असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सिल्लोड मतदारसंघात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. आपल्या कार्यक्रमात गोंधळ होत असल्याचे पाहून सत्तार संतापले आणि त्यांनी पोलिसांना थेट लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला. तसेच तरुणांना उद्देशून शिवीगाळही केली. दरम्यान, आपण ग्रामीण भाषेतल्या बोलीमध्ये बोलून गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी या प्रकारावर भूमिका मांडली.
संबंधित बातम्या