Nitesh Rane on Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या भरदिवसा झालेल्या हत्येमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मोहोळ याच्या गुन्हेगारी प्रवासावर वेगवेगळ्या बातम्या येत असतानाच भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज मोहोळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वनं केलं. शरद मोहोळ हे हिंदुत्ववादी होते. मीडियानं त्यांची चुकीची प्रतिमा रंगवू नये, असं आवाहन नीतेश राणे यांनी केलं.
शरद मोहोळ यांचा मागील आठवड्यात भर दुपारी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. मोहोळ याची पुण्यात प्रचंड दहशत होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या हत्येनंतर पुण्यातील गँगवार व कायदा-सुव्यवस्थेची चर्चा सुरू झाली होती. तसंच, मोहोळ याच्या आजवरच्या प्रवासाच्या अनेक कथा चर्चिल्या जाऊ लागल्या होत्या. मात्र, नीतेश राणे यांनी आज वेगळीच माहिती दिली.
‘शरद मोहोळ हे एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. संकटाच्या काळात ते आणि त्यांचं कुटुंब हिंदूंच्या मदतीला धावून जात होते. त्यामुळं आताच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबासोबत उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या भावनेतूनच मी इथं आलो होतो, असं नीतेश राणे मोहोळ कुटुंबीयांच्या भेटीनंतर म्हणाले.
शरद मोहोळ यांच्या खुनाचा पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत. मोहोळ ताई या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं तपासातून सर्व माहिती समोर येईल. शरद मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी अजिबात खचून जाऊ नये. आम्ही सगळे कुटुंब म्हणून त्यांच्यासोबत आहोत, असं नीतेश राणे म्हणाले.
हिंदुत्वासाठी उभं राहून काम करणं सोपं नाही. शरद मोहोळ आणि कुटुंबानं हे काम केलं आहे. मात्र, शरद मोहोळ यांच्या खुनानंतर मीडियात त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांची प्रतिमा चुकीची दाखवली जात आहे. मीडियानं हे टाळावं,' अशी अपेक्षा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
संबंधित बातम्या