Maha Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केली आहेत. भाजपनं यात आघाडी घेतली असून भाजपची १०० हून अधिक उमेदवारांची यादी तयार असल्याचं समजतं. भाजपनं काही विद्यमान आमदारांना धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व पक्षाचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांच्यासह ५ आमदारांचा समावेश आहे.
राम कदम हे मागील तीन टर्मपासून आमदार आहेत. २००९ साली ते मनसेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर २०१४ साली वाऱ्याची दिशा पाहून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आणि २०१९ च्या निवडणुकीत ते सहज निवडून आले. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याची शक्यता नसल्याचं समजतं.
राम कदम हे प्रसिद्धी व प्रचारामध्ये माहीर आहेत. घाटकोपर विभागात ते दरवर्षी दहीहंडी, रक्षाबंधन हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. मतदारसंघातील नागरिकांना दरवर्षी ते विनामूल्य धार्मिक स्थळांच्या यात्रा घडवतात. कीर्तन करतात. मतदारसंघात त्यांनी स्वत:ची डॅशिंग आणि दयावान आमदार अशी केली आहे. मात्र, मतदारसंघात त्यांची प्रत्यक्ष कामगिरी अत्यंत सुमार असल्याचं पक्षाचं मत बनलं आहे.
कदम यांचा विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार पिछाडीवर राहिला होता. तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दीना पाटील आघाडीवर होते आणि निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. ही बाबही कदम यांच्या विरोधात गेली आहे.
गेल्या दहा वर्षांत भाजपमध्ये बाहेरील अनेकांचा भरणा झाला आहे. त्यांना मानाची पदंही मिळाली आहेत. त्यामुळं पक्षाचे मूळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पक्षानं त्यांची दखल घेऊन या चुका दुरुस्त करण्याचं ठरवल्याचं समजतं. त्यामुळं राम कदम यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी संधी देण्याचा भाजपचा विचार आहे.
राम कदम यांच्याशिवाय वर्सोव्याच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर, बोरिवलीचे सुनील राणे, सायनचे आमदार कॅप्टन तमील सेल्वन आणि घाटकोपर पूर्वचे पराग शाह यांनाही तिकीट नाकारलं जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील काही नावांचाही समावेश असू शकतो. त्यामुळं कोणाला संधी मिळणार आणि कोणते चेहरे नवे येणार याबद्दल उत्सुकता आहे.