मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपचा संकल्प ‘महाविजय २०२४’, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी BJP चा मेगाप्लॅन

भाजपचा संकल्प ‘महाविजय २०२४’, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी BJP चा मेगाप्लॅन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 11, 2023 07:44 PM IST

Bjp maha Vijaya 2024 campaign : नाशिकमध्ये पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू समर्थकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपचा संकल्प ‘महाविजय २०२४’
भाजपचा संकल्प ‘महाविजय २०२४’

नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी शिबिरात भाजपने आगामी निवडणुकांसाठी 'महाविजय २०२४' (Bjp maha Vijaya 2024) अशा संकल्पनेची घोषणा केली आहे. भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले असून कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. भाजपने लोकसभेसाठी 'मिशन ४५', तर विधानसभेसाठी 'मिशन २००' जाहीर केले आहे. विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे प्रदेश संयोजक (निवडणूक  प्रभारी) म्हणून काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली. 

नाशिकमध्ये भाजपची राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपले लक्ष्य काय आहे, याची घोषणा केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन २०० चा नारा दिला आहे. भाजप कार्यकारिणीने लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधान सभेसाठी मिशन २०० चे लक्ष्य निश्चित केले आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोविण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे. 

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक व राज्यात आगामी मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे नाशिकमध्ये दोन दिवसांपासून मंथन सुरू होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत भाजपकडून राज्यात मिशन २०० चा नारा देण्यात आला आहे. केंद्रात पुन्हा भाजपचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी राज्यातून अधिकाधिक खासदार निवडून आणून रसद पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील ४८ पैकी ४५ जागांवर विजयाचा संकल्प करण्यात आला आहे.

WhatsApp channel