भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

Nov 19, 2024 02:37 PM IST

Vinod Tawde in Virar: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. मात्र, त्याआधी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोप बहुजन विकास आघाडीने केला असून बविआ व भाजपच्या कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला आहे.

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा
भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा (Hindustan Times)

Vinod Tawde in Virar: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची सोमवारी सांगता झाली. उद्या बुधवारी मतदान होणार असून या मतदानापूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विरार येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी तब्बल पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये तावडे यांनी पैसे वाटले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केला. यामुळे भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.

राज्यात विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडत आहे. बहुजून विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडे ही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. तब्बल पाच कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे बहुजन विकास आघाडीने म्हटलं आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.

या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकूर म्हणाले, विनोद तावडे हे  विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन त्याचे वाटप करत  होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दोन डायऱ्या सापडल्या आहेत. आता प्रचार संपला आहे. त्यानंतर देखील विनोद तावडे हे मतदार संघात कसे आहेत? मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे त्यांना माहीत नाही का ? असा सवाल देखील ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तावडे यांनी त्यांना तब्बल २५ वेळा फोन केल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. हे प्रकरण ताणू नका व मिटवा असे म्हणत तावडे यांनी दबाव आणल्याचे  ठाकूर म्हणाले. दरम्यान, पराभव पुढे दिसत असल्याने असे आरोप विरोधक करत असल्याचा आरोप भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भाजपचा खेळ खल्लास! संजय राऊत यांची टीका 

दरम्यान या प्रकारावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी एक्सवर विनोद तावडे यांचा व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला आहे. भाजपचा खेळ खल्लास झाला असून जे काम निवडणूक आयोगाने करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले, असे त्यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो मात्र,  इकडे शेपूट घालतो, असे देखील राऊतांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर