Shinde Group vs BJP In Dahisar Mumbai : शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून सुरू झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा नेत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विभीषण वारे यांना मारहाण केली असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात ठाण्यात जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत तुफान राडा झाला आहे. त्यामुळं आता यावरून राजकरीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भाजप नेत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते विभीषण वारे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत काम करत होते. परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातूनच हल्ला झाल्याचं विभीषण वारे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच पोलिसांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं आता सत्ताधारी शिंदे गटाकडून भाजप नेत्याला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.
शिंदे गटाच्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध...
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विभीषण वारे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत राजकीय सूडापोटीच वारे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता दहिसरमधील या घटनेमुळं भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या