जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाच्या अध्यादेश काढण्यासाठी चार दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यातच त्याची प्रकृती आज अजून खालावल्याने त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. कमिटीचा ड्राफ्ट व्यवस्थितअसता तर मराठा समाजाला तेव्हाच १०० टक्के आरक्षण मिळालं असतं. समितीचा मसुदाच योग्य नसल्याने हे आरक्षणकोर्टात टिकलं नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. त्या साताऱ्यातील फलटण येथे माध्यमांशी बोलत होत्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा करत असून त्या पुण्याहून साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. त्यापूर्वी अहमदनगरहून नाशिकला सप्तश्रृंगी देवीचे त्यांनी दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी राज्यात सध्या तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने गठित केलेल्या कमिटीवर निशाणा साधला.
पंकजा मुडे म्हणाल्या की, मराठा आरक्षणावर मी यापूर्वीच मत व्यक्त केलं आहे. जालन्यात झालेल्या लाठीमार प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या विषयावर मी, छगन भुजबळ, नाना पटोले आणि बावनकुळे, वडेट्टीवार या सर्वांचं ठाम मत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी समिती आहे त्यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात का टिकलं नाही, हे पाहिले पाहिजे. मराठा आरक्षण न मिळण्यास समितीने तयार केलेला ड्राप्ट जबाबदार आहे. जर ड्राफ्ट व्यवस्थित असेल तर मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळालं असतं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरु आहे. दोन शक्तीपीठांचं व दोन जोर्तिंलिंगांच दर्शन झालं आहे. मला लोकांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे मी लोकांनी भेटत आहे.