मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…

Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांनी केलं भाऊरायाचं औक्षण, धनंजय मुंडे ट्वीट करून म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 07, 2023 12:08 PM IST

Pankaja Munde met Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारमध्ये नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आपले बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांचं औक्षण केलं.

Pankaja Munde - Dhananjay Munde
Pankaja Munde - Dhananjay Munde

Pankaja Munde met Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले राजकीय पक्ष अचानक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समोर येत आहेत. वैयक्तिक पातळीवरही असंच काहीसं चित्र आहे. धनंजय मुंडे यांनी आज केलेलं ट्वीटही त्याचंच निदर्शक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन औक्षण केल्याचं हे ट्वीट आहे. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून नुकतेच ते अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी भाऊ धनंजय यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पंकजा या भाऊरायाचं औक्षण करताना दिसत आहेत. तसंच, त्यांना पेढा भरवत आहेत. 'राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईनं माझं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, असं धनंजय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंकजा व धनंजय हे दोघेही भाऊ-बहीण बीड जिल्ह्यात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. २०१९ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा यांचा पराभव केला होता. त्यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. स्थानिक निवडणुकांमध्येही दोघे आमनेसामने दिसले होते. मात्र, आता हा दुरावा कमी झाल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांमध्ये दोघेही भाऊ-बहीण अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.

पंकजा मुंडे यांना भाजपनं एकप्रकारे राजकीय अडगळीत टाकलं आहे. विधानसभेत पराभव झाल्यापासून संघटनेतील पद वगळता त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेत संधी देण्यात आली नाही. अधूनमधून त्यांनी ही खंत व्यक्तही केली आहे. आता धनंजय मुंडे यांच्या पक्षानं थेट भाजपशी घरोबा केल्यानं त्यांची अधिकच अडचण झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोघा भावा-बहिणींची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीचे राजकीय अर्थ आता काढले जाऊ लागले आहेत.

WhatsApp channel