Pankaja Munde : ‘जी भूमिका घेईन ती छातीठोकपणे घेईन’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Pankaja Munde Speech : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
Pankaja Munde On Devendra Fadnavis : परळी विधानसभेत धक्कादायक पराभव झाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या सातत्याने नाराज असल्याची चर्चा होत आहे. विरोधकांनी पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. परंतु आता भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणात मी जी काही भूमिका घेईन ती छातीठोकपणे घेईन, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षांतराचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष रंगल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यावरून भाजपातील वाद चव्हाट्यावर आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरून बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणतीही राजकीय भूमिका घ्यायची असेल तर मी माध्यमांना बोलावून बिनधास्त भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावणं माझा स्वभाव नाही. मला जी काही भूमिका घ्यायची आहे, ती मी छातीठोकपणे घेणार आहे. मी ठरवलेल्या भूमिकेशी आजतागायत ठाम असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे. पराभव झाल्यानंतर मी विरोधक किंवा माध्यमांना अद्यापही संभ्रम निर्माण करण्याची संधी दिलेली नाही. तसेच मी अद्याप कोणतीही चर्चा ओढावून घेतलेली नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत अनेक तात्कालीन मंत्री पराभूत झाले. मात्र त्यांना सातत्याने पक्षाकडून संधी देण्यात आली. गेल्या चार वर्षाच्या काळात दोन डझन लोक आमदार-खासदार झालेत. त्यात माझा समावेश झाला नाही तर लोक चर्चा करणारच आहेत. ही चर्चा काही मी सुरू केलेली नाहीय, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत संधी न मिळाल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे देखील उपस्थित होते.