पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का; ‘हा’ दिग्गज फुंकणार तुतारी! सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का; ‘हा’ दिग्गज फुंकणार तुतारी! सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का; ‘हा’ दिग्गज फुंकणार तुतारी! सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

Oct 03, 2024 03:59 PM IST

Harshvardhan patil : इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरचशरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

शरद पवार
शरद पवार

महाराष्ट्र विधानसभेची घोषणा नवरात्रीतच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या अनेक शिलेदारांना गळाला लावल्यानंतर भाजपला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी भाजप सोडल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक भाजपचा बडा नेता शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मुंबईत पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. जवळपास १ तास त्यांच्यात चर्चा झाली.

माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपाला रामराम ठोकणार हे, जवळपास निश्चित झाले आहे. समरजितसिंह घाटगे यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या रुपात पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याच्याआधी लोकसभा निवडणुकीच्या आधी सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली होती.

महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघात विधानसभेची तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील आता पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. याच्या गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू होत्या. त्यातच आज त्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झालं आहे. इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर लढणे जवळपास पक्के झाले आहे.

महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला वापरण्यात आला. इंदापूर मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात तयारी करणारे हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. लोकसभेवेळीच विधानसभेचा शब्द द्या अशी भूमिका तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून घेतली जात होती. स्वत: फडणवीस यांनी इंदापूरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर